Thursday, October 22, 2020
Home राजकारण महाराष्ट्राचा गेम ऑफ थ्रोन्स  

महाराष्ट्राचा गेम ऑफ थ्रोन्स  

गेल्या १५-२० दिवसांपासून आपण महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष पाहत आहोत, या वादाची सुरुवात मुख्यमंत्रीपदी कोणत्या पक्षाचा नेता बसेल यावरून झाली. त्यामुळेच मला प्रसिद्ध हॉलिवूड मालिका ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची आठवण झाली. त्या मालिकेत संपूर्ण संघर्ष कोणते घराणे थ्रोन(सिंहासन) वर बसेल यावरून सुरु असतो. आणि सिंहासनाला त्याचा योग्य हकदार मिळावा त्यादिशेने संपूर्ण कथा वाटचाल करत असते. रॉबर्ट नावाचा राजाचा मृत्यू झाल्यानंतर सिंहासनावर दावेदारी सांगण्यासाठी विविध घराणी संघर्षरत असतात.


महाराष्ट्रातही तशीच काहीशी परिस्थिती उद्भवलेली दिसते आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपाला पूर्वीपेक्षा कमी जागा मिळाल्या, आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेनं ‘हीच ती वेळ’ साधत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठीचा तगादा लावून सत्ता संघर्ष सुरु केला. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या अडचणीत वाढ झाली. अर्थात हा शेवट नाहीये, तूर्तास तरी त्यांच्या वाटेला संघर्ष आला आहे. गेम ऑफ थ्रोन्समध्ये रॉबर्ट राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्या थ्रोनवर बसण्यायोग्यतेची व्यक्ती त्याचा मित्र नेड स्टार्क हाच राजा व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा असली, तरी नेड आणि त्याच्या कुटुंबियांच्या नशिबी संघर्षच येतो. तसच काहीसं महाराष्ट्राच्या जनतेचं झालंय, योग्यतेच्या व्यक्तीला (ज्याच्या चेहऱ्याकडेपाहून शिवसेनेसहीत महायुतीला जनतेने निवडून दिले होते) सत्तेसाठी संघर्ष  करावा लागत आहे.


अर्थात गेम ऑफ थ्रोन्समध्ये १४५ ची मॅजिक फिगर ही भानगड नसल्यामुळे मालिका ८ सिझन पर्यंत चालू शकली. येथे मात्र २० दिवसांनी महामहिम राज्यपालांनी खेळाला स्वल्पविराम लावला आहे. सत्तासंघर्ष असलेल्या त्या मालिकेत शेवटच्या सिझनपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता ‘आयर्न थ्रोनवर कोण बसणार?’ तसाच प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे, की १४५ ची मॅजिक फिगर गाठून मुख्यमंत्री कोण होणार? कारण राष्ट्रपती राजवट जरी लागू झालेली असली तरीही १४५ आमदारांचे समर्थन मिळवून सत्तास्थापनेसाठी दावेदारी करण्यासाठी कोणताही पक्ष मोकळा आहे (अर्थात काहींनी आमदारांना कोंडून न ठेवल्यास) भाजपा-सेना महायुती असं सगळं निवडणुकीआधी गुण्यागोविदांनं चालत असलं तरी देखील निकालानंतर सगळंच बदललं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरु झाल्या, त्यात भाजपाने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखवून मोठा मास्टर स्ट्रोक खेळाला. मग सेनेला राज्यपालांनी आमंत्रित करून सत्ता स्थानेसाठी पाठिंबा जमवण्याचा अधिकृत चान्स दिला. तेव्हा त्यात अपयशी ठरून शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढावली, आणि सेनेनं स्वतः स्वतःचं हासं करून घेतलं. कारण ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर सेनेनं भाजपाशी काडीमोड केला त्यात शिवसेनेचं केंद्रीय मंत्रिपद देखील पाण्यात वाहून गेलं. त्यामुळे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी गत शिवसेनेची झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मागून(अधिकृतरीत्या) ४८ तास लोटले तरी दोघांनी अजून हि निर्णय ‘बघू ..’ असाच ठेवलाय. गेम ऑफ थ्रोन्समध्ये थिऑन ग्रेजॉय याची कहाणी देखील अशीच काहीशी आहे. ग्रेजॉय घराण्यातील राजपुत्र आणि स्ट्रार्क घराण्यात वाढलेला व मैत्री असलेल्या थिऑनने स्ट्रार्क घराणे नेमके संकटात असताना, त्यांचा केवळ बाल वयातील राजकुमार राजधानीच्या ठिकाणी असताना हल्ला केलेला असतो, त्यात त्याला काही दिवस स्ट्रार्क यांच्या विंटरफेलवर कब्जा मिळतो आणि काही दिवस तो तेथे सत्ता उपभोगतो देखील, मात्र नंतर त्याच्यावर मोठ्ठी नामुष्की ओढवते, कारण त्यापेक्षा प्रबळ असा रॅम्सन बोल्टन जेव्हा विंटरफेलवर आक्रमण करतो तेव्हा तो केवळ त्याच्याकडून विंटरफेल हिसकावून घेत नाही तर थिऑनला आपला गुलाम बनवून त्याला नपुंसक देखील करून टाकतो. नपुंसक असल्यामुळे थिऑन आपल्या मूळ ग्रेजॉय घराण्याचा एकमेव पुत्र असला तरी त्या घराण्याच्या सॉल्ट थ्रोनचा देखील उत्तराधिकारी तो ठरू शकत नाही.


गेम ऑफ थ्रोन्सचा शेवट मात्र खूप उत्तम आणि अनाकलनीय पद्धतीने करण्यात आला आहे. कारण सिझन ७ व सिझन ८ मध्ये तब्बल दोन वर्षांचे अंतर ठेवल्यामुळे अनेकांनी आपल्या पद्धतीने कुणाला सिंहासन मिळेल याचे भाकीत वर्तविले होते. मात्र सगळ्यांना फोल ठरवत त्या आयर्न थ्रोनवर लेखकाने ‘घराणेशाहीनुसार’ ही मूळ रीतच संपवून ‘योग्यतेनुसार’ व्यक्तीची निवड अशी त्या ७ किंग्डमसची रीत बनवली आणि परिणामी नेड स्ट्रार्कचा पुत्र ब्रान स्ट्रार्कला थ्रोनवर बसविले. मला वाटते महाराष्ट्रात रंगत असलेला गेम ऑफ थ्रोन्सचा शेवट देखील असाच व्हावा. मुख्यमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीच तेथे विराजमान होऊन राज्यकारभार गतिशील व्हावा. परंतु त्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर गाठण्याची कसब करावी लागेल, आणि त्यातूनच राजकारणाची योग्यता सिद्ध होईल, आणि पुन्हा निवडणूक झाल्यास जनता जनार्दन सर्वांना आपापली जागा निश्चितच दाखवेल.

हर्षल कंसारा   

Harshal Kansara
Harshal Kansarahttp://marathimood.com
माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...