Thursday, October 22, 2020
Home प्रेरणादायी ग्रेटा थनबर्ग एक पर्यावरण रक्षक

ग्रेटा थनबर्ग एक पर्यावरण रक्षक

आजकाल आपल्याला जागतिक मंचावर पर्यावरण रक्षणासंदर्भात एक नाव खूप जास्त ऐकायला मिळत आहे आणि ते नाव म्हणजे पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हे आहे. सध्या तिच्या भाषणाने जागतिक महासत्ता असणाऱ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष देखील घाबरले असून, तिच्या पाठीशी आता संपूर्ण जगातील तरुण पिढी उभी असल्याचे दिसत आहे.
तुम्ही आमच्या तरुण पिढीचं भविष्य धोक्यात टाकत आहात, तुम्ही आमचं भविष्य आमच्यापासून हिसकावून घेतलं आहे, हे सगळं करण्याची तुमची हिम्मत कशी झाली अशा खड्या शब्दांत जगातील दिग्गज नेत्यांना प्रश्न विचारणारी ही ग्रेटा थनबर्ग आहे तरी कोण?

अवघ्या १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिने सध्या हवामान बदलाच्या मुद्द्यावरून संपूर्ण जगाला जागरूक केले आहे. ग्रेटा थनबर्ग हिचा जन्म ३ जानेवारी २००३ ला स्वीडनमध्ये झाला. तिची आई मालेना अर्म्नन एक ऑपेरा गायिका असून तिचे वडील स्वत्ते थनबर्ग हे स्वीडिश अभिनेते आहे. लहानपणापासूनचं आई वडीलांनी ग्रेटाला सामाजिक जाणीव आणि पर्यावरणप्रेमी गोष्टींची माहिती देण्यास सुरुवात केली होती. ही जडणघडण होत असताना ग्रेटा देखील सामाजिक आणि पर्यावरण या विषयात रुची घेत होती. त्यानंतर ग्रेटा हिने केवळ घरी बसून पर्यावरणावर बोलून आपले पर्यावरण स्वच्छ होणार नाही, याचा अनुभव घेतला आणि यावर उपाय म्हणून तिने थेट जागतिक मंचावरील दिग्गजांना पर्यावरणाप्रती जागरूक करण्यासाठी मोहीम हाती घेतली. ऑगस्ट २०१८ मध्ये ग्रेटा पहिल्यांदा पर्यावरण कार्यकर्ती म्हणून नावारूपास आली. तेव्हा ती केवळ १५ वर्षांची होती. पृथ्वीवरील इकोप्रणाली दिवसेंदिवस उध्वस्त होत चालली आहे. यामुळे आपण आता या समस्येकडे लक्ष दिले नाही, तर पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असेल आणि आपण तेव्हा काहीच उपाय करू शकणार नाही. या अंधारमयी भविष्याची सुरुवात झाली आहे आणि यासाठी ग्रेटाने एक मोहीम हाती घेतली आहे. ती आठवड्यातील एक दिवस म्हणजेच शुक्रवारी शाळेत जात नाही आणि यादिवशी ती स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील संसदेपुढे पर्यावरण हा मुद्दा घेऊन प्रदर्शन करते व घोषणा देते. यावेळी ती नेत्यांचे आणि सामान्य जनतेचे जलवायू परिवर्तन या समस्येकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करते. ग्रेटा हिची शाळा देखील school strike for climate आणि future for friday campaign साठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये school strike for climate द्वारे जे प्रदर्शन करण्यात आले त्यात २४ देशांचे १७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यानंतर जलवायू परिवर्तन या विषयावर घेण्यात येणाऱ्या जागतिक परिषदांमध्ये आणि भाषणांमध्ये ग्रेटा हिने आपला सहभाग दर्शविला होता.
यावर्षी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेमध्ये जलवायू परिवर्तन हा मुख्य विषय होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पर्यावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर चिंता व्यक्त केली होती. २०१९ च्या संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेच्या जलवायू संमेलनात ग्रेटा थनबर्ग हिने दिलेले भाषण सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधत आहे. ग्रेटाच्या भाषणाने प्रदूषण, जागतिक उष्णता, ग्लोबल वॉर्मिग, जलवायू परिवर्तन, मेल्टिंग अंटार्टिका यासारख्या जग संपवणाऱ्या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहणे तसेच यावर केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर आता प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. हा विचार करण्यास जगाला भाग पडले आहे.
“विज्ञानाचा शोध मानवाने स्वतःच्या प्रगतीसाठी लावला त्यामुळे ३० वर्षांपर्यंत विज्ञान मानवहिताचे होते मात्र या बाबीकडे गेल्या काही वर्षांमध्ये दुर्लक्ष करण्यात आले. राजकारण आणि कूटनीतीच्या जोरावर पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले.तुम्ही पर्यावरणासाठी खूप चर्चा केल्या भाषणे दिली मात्र त्या भाषणांची अंमलबजावणी कुठेच प्रत्यक्षात युवा वर्गाला दिसली नाही. जनतेचे आम्ही ऐकतो आणि त्यांच्या समस्यांची आम्हाला जाण आहे असे तुम्ही केवळ बोलतात मात्र प्रत्यक्षात खरी परिस्थिती याहून उलट आहे. तुम्हाला भविष्यातील धोका माहित असूनही तुम्ही याकडे दुर्लक्ष कसे करू शकता.
तुम्ही पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत असाल तर चुकत आहात. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. युवा वर्गाला तुम्ही खोटे आश्वासन देत आहात. येणाऱ्या पिढ्यांच्या नजारा तुमच्यावर आहेत. तुम्हाला आम्ही असे जावू देणार नाही. जग जागे होते आहे. बदल घडतो आहे आणि तो तुम्हाला मान्य नसेल तरीही आम्हाला चालेल मात्र पर्यावरण वाचवणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.” अशा खड्या शब्दांचे भाषण ग्रेटा थनबर्ग हिने संयुक्त राष्ट्र परिषदेच्या जलवायू संमेलनात दिले आहे.
आजपर्यंत केवळ नेत्यांनी चर्चा केल्या मात्र आता कृतीत आणण्याची गरज आहे. ती कृती हा युवावर्ग करून दाखवेल अशी घोषणा ग्रेटाने या भाषणात दिली आहे. जर्मनी, फ्रांस, अर्जेंटिना, ब्राझील आणि तुर्की या देशांच्या विरुद्ध ग्रेटासहित १५ मुलांनी विरोध दर्शविला आहे. हे पाच देश मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहेत असे या मुलांचे म्हणणे आहे. ग्रेटाच्या या भाषणावर जगातून विविध ठिकाणाहून प्रतिक्रिया देखील येत आहेत. मात्र मोठ्या राष्ट्रांचे नेते ग्रेटाच्या भाषणावर फारसे आनंदी नाहीत असे दिसते आहे. जर्मनीचे व्हाईस चान्सलर यांनी ग्रेटासोबत आपले एक छायाचित्र ट्विट केले होते. या ट्विटनंतर मात्र त्यांच्यावर आलोचनांचा वर्षांव होतांना दिसत आहे. कोळश्याचा वापर बंद करण्यावर जर्मनी काहीच उपाययोजना करत नाही आणि आता तुम्ही ग्रेटासोबत छायाचित्र काढत आहात. मात्र उपाययोजनांचे काय? अशा मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी सध्या त्यांच्यावर आक्षेप घेत आहे.
तर फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रेटाच्या या भाषणाला काहीच अर्थ नाही असे म्हटले आहे. सरकार विरुद्ध इतका राग बरोबर नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी ग्रेटाला शांत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ग्रेटाच्या भाषणाला अतिशय सामान्य स्तरात घेतले. ग्रेटा एक आनंदी मुलगी आहे, जिचे भविष्य उज्वल आहे तिने पर्यावरणाची चिंता करण्याची गरज नाही अशा शब्दांमध्ये ग्रेटाला ट्रम्प यांनी सल्ला दिला. अशा प्रकारचे विविध सल्ले दिल्याने येथे विषय संपत नाही तर येथून विषय सुरु होतो. असे सल्ले मोठ्या देशांचे नेते देतात मात्र ते पर्यावरण बदलासाठी काय नवीन उपाययोजना करतात हे जास्त महत्वाचे आहे. एका १५ वर्षांच्या मुलीला जे समजते आहे, जो धोका भविष्यात दिसतो आहे. तो धोका या विचारी, हुशार व्यक्तिमत्त्वांना का दिसत नाही? म्हणून यावर युवावर्गाने विचार करणे महत्वाचे आहे. आपल्याला शक्य असेल तेवढे पर्यावरणवादी होणे हि काळाची गरज आहे असा संदेश घेऊन तरी ग्रेटाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. ग्रेटाने जी मोहीम सुरु केली आहे त्या मोहिमेला आपण साथ दिली तर आपण पृथ्वीचा विनाश होण्यास वाचवू शकतो तसेच आपल्या पुढच्या पिढीला चांगले भविष्य देण्यास आपण सुरुवात करू शकतो. जागतिक राजकारण आणि कूटनीती यांच्या पुढे जाऊन आपण केवळ पृथ्वीचे रहिवासी आणि पृथ्वी आपली जननी असा विचार करून तर पर्यावरण मोहीम नक्कीच हाती घेऊ शकतो.

Neha Jawale
Neha Jawale
A journalist. Masters in Mass Communication and journalism. Western Dancer and Singer. Traveler, outspoken...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...